Nawazuddin siddiqui video on Religion viral again related to CAA

सध्या सगळीकडे सीएए आणि एनसीआरविरोधात देशात गंभीर वातावरण आहे. सगळ्या गोष्टी शेवटी येऊन धर्मावर थांबत आहेत. या सर्व आंदोलनात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याचसंबंधी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल...

Nawazuddin siddiqui video on Religion viral again related to CAA

सध्या सगळीकडे सीएए आणि एनसीआरविरोधात देशात गंभीर वातावरण आहे. सगळ्या गोष्टी शेवटी येऊन धर्मावर थांबत आहेत. या सर्व आंदोलनात सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याचसंबंधी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना इतका भावतोय की तो त्याने सध्याच्या परिस्थितीला अनुसरूनच शेअर केला आहे की काय असे वाटते. या व्हिडिओचे नाव 'Sixteen Point Six Six' असे आहे.  

नावजुद्दीन सिद्दीकीने साधारण तीन वर्षांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो वेगवेगळे पोस्टर हातात घेऊन आणि विविध पोशाख करून एक-एक संदेश देतोय. हे सगळे संदेश इतके पॉवरफुल आहेत, की ते तुमच्या मनावर खोल परिणाम करतात. पहिल्या पोस्टरमध्ये तो म्हणतो की, 'हाय मी नवाजुद्दीन सिद्दीकी.' दुसऱ्या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, 'मी माझी डिएनए टेस्ट केली, त्याचे रिपोर्ट्स आले, त्यात लिहिले आहे की...' मग पुढे तो वेगवेगळे पोस्टर हातात धरतो व त्यावर लिहिले आहे की, 'हिंदू - 16.66%', 'मुस्लिम - 16.66%', 'सिख - 16.66%', 'ख्रिश्चन - 16.66%', 'बुद्धीस्ट - 16.66%', 'जगातील इतर सर्व धर्म - 16.66% पण...' पुढील पोस्टरमध्ये लिहिलेले असते, 'जेव्हा मी आत्म्याचा विचार करतो त्यावेळी मी 100% कलाकार असतो.' त्याच्या या व्हिडिओने पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

 

जामिया मिलीया हिंसाचारप्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकार या आंदोलनात उतरले होते. परिणीती चोप्रा, विकी कौशल, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, राजकुमार राव, प्रियांका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी या सगळ्यांनीच या आंदोलनाला समर्थन दिले. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नवाजुद्दीनचा हा व्हिडिओ अत्यंत बोलका आहे व परिस्थितीशी साधर्म्य साधणारा आहे.