Video : नाताळ सुट्ट्यांमुळे बहरले महाबळेश्‍वर, पाचगणी

पाचगणी - महाबळेश्‍वर : नाताळाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांच्या गर्दीने फुललेल्या महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेत आज (मंगळवार) चक्क नाताळबाबा अवतरला. हा नाताळबाबा लहान मुलांना खाऊ वाटप करीत होता. अनेक पर्यटकांनी नाताळ बाबांबरोबर सेल्फी काढण्याचाही...

Video : नाताळ सुट्ट्यांमुळे बहरले महाबळेश्‍वर, पाचगणी

पाचगणी - महाबळेश्‍वर : नाताळाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांच्या गर्दीने फुललेल्या महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेत आज (मंगळवार) चक्क नाताळबाबा अवतरला. हा नाताळबाबा लहान मुलांना खाऊ वाटप करीत होता. अनेक पर्यटकांनी नाताळ बाबांबरोबर सेल्फी काढण्याचाही आनंद लुटला. नाताळ बाबांबरोबर छोटा भीम व चुटकी देखील होते. या कार्टूनमधील पात्रांमुळे बच्चे कंपनी जाम खूश झाली होती.
 
ख्रिश्‍चन धर्मियांचा नाताळ हा पवित्र सण मानला जातो. नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला नाताळबाबा आपल्याला भेटायला येतात. येताना आपल्या पाठीवरील पोतडीत खाऊ आणतात व सर्वांना ते खाऊ वाटतात अशी आख्यायिका सांगितली जाते. येथील हॉटेल मॅंगो यांच्या वतीने दर वर्षी नाताळाच्या पूर्वसंध्येला नाताळ बाबांची फेरी काढली जाते.

आज (मंगळवार) सायंकाळी पाच वाजता नाताळ बाबांची ही फेरी महाबळेश्वरच्या बाजारपेठेत आली. आपल्या पाठीवर खाऊची धोपटी घेऊन नाताळबाबा आल्याचे पाहून बच्चे कंपनीचा गराडा पडला. नाताळबाबा पाहण्यासाठी गर्दी जमू लागली.

 

नाताळबाबा बरोबर छोटा भीम व चुटकी हे ही आले होते, तसेच फेरीमध्ये सहभागी झालेल्यांनी नाताळबाबांची लाल टोपी परिधान केली होती. नाताळबाबांचे गाणे म्हणत ही फेरी बाजारपेठेतून पुढे जाताना जागोजागी पर्यटक नाताळबाबांबरोबर सेल्फी काढून आनंद घेत होते. खाऊ वाटप करीत नाताळबाबांची ही फेरी बाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

पाचगणीत नाताळ निमित्त चर्चमध्ये कार्यक्रम
पाचगणी ः
नाताळ निमित्त महानगरांमधील शाळांना सुट्टया लागल्याने पाचगणी येथे पर्यटकांची माेठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. येथील जून्या सन 1876 मधील चर्चमध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.

या चर्चमध्ये देश विदेशातील पर्यटक नाताळ निमित्त भेट देण्यासाठी येतात. येथे रात्री 12 वाजता प्रार्थना तसेच विविध कार्यक्रम हाेणार आहेत.