पुणे : बिलाच्या कारणांवरुन ग्राहक अन् हॉटेल कर्मचाऱ्यात वाद; बाऊंसरकडून गोळीबार

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील एका हॉटेलमध्ये मद्यपान व जेवण केल्यानंतर बिल न देता हॉटेलमधील कर्मचारी व व्यवस्थापकांशी ग्राहकांनी भांडणे केली. दरम्यान, वाद वाढत गेल्याने हॉटेलमधील बाऊंसरने पिस्तुलातुन हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी रात्री...

पुणे : बिलाच्या कारणांवरुन ग्राहक अन् हॉटेल कर्मचाऱ्यात वाद; बाऊंसरकडून गोळीबार

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील एका हॉटेलमध्ये मद्यपान व जेवण केल्यानंतर बिल न देता हॉटेलमधील कर्मचारी व व्यवस्थापकांशी ग्राहकांनी भांडणे केली. दरम्यान, वाद वाढत गेल्याने हॉटेलमधील बाऊंसरने पिस्तुलातुन हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेत घडली. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गोळीबार करणाऱ्यासह 13 जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

महिमाशंकर तिवारी असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. तर ग्राहक अक्षय सुभाष काळोखे, संतोष बाळासाहेब बोराटे, सागर सुभाष आगलावे असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्यासह मदन चंद्रभान कुंवर, ग्यानींदर नीरव कुंवर, प्रवीण सतीश पाटील, सनीदुल्ल हमीदुल्ल इस्लाम, कमल मकाजत कुंवर, विष्णू नरबहादूर खडका, विशाल केशव कुटे, संजय शामराव पाटील, आनंद कृष्णनाथ महाडीक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी रविकांत कदम यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेतील हॉटेल वसंत बार येथे काळोखे, बोराटे व आगलावे असे तिघेजण जेवण करण्यासाठी आले होते. त्यांनी जेवण केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मद्यपान केले. त्यानंतर ते घरी जाताना हॉटेलमधील कर्मचाऱ्याने त्यांच्याकडे बिल दिले. त्यावेळी त्यांनी बिल भरण्यास नकार दिला. त्यावरुन हॉटेल कर्मचारी व ग्राहकात वाद सुरू झाले. काही वेळाने वादाचे पर्यवसन मारहाणीमध्ये झाले. दरम्यान, हॉटेलमध्ये सुरक्षिततेच्या नावाखाली ठेवलेल्या महिमाशंकर तिवारी या बाऊंसरने या वादामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाद आणखीन वाढला. अखेर बाऊंसरने त्याच्याकडील पिस्तुलातुन हवेमध्ये गोळीबार केला.