400 KM journey due to daughters insist in Pune Marathon

पुणे : शालेय स्पर्धांमध्ये मुली चमक दाखवत असतानाच मोठ्या स्पर्धांचाही अनुभव आला पाहिजे. त्यामुळेच मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा निश्‍चय मुलींनी केला अन्‌ त्यांचा हट्ट वडिलांनीही पूर्ण केला. पुण्यापासून सुमारे 400 किलोमीटरवर असलेल्या उदगीरवरून...

400 KM journey due to daughters insist in Pune Marathon

पुणे : शालेय स्पर्धांमध्ये मुली चमक दाखवत असतानाच मोठ्या स्पर्धांचाही अनुभव आला पाहिजे. त्यामुळेच मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा निश्‍चय मुलींनी केला अन्‌ त्यांचा हट्ट वडिलांनीही पूर्ण केला. पुण्यापासून सुमारे 400 किलोमीटरवर असलेल्या उदगीरवरून आलेल्या मुलींनी मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केल्याचे समाधान त्यांच्यासह वडिलांच्या चेहऱ्यावरही दिसत होते.

 

चंद्रकांत पानचौरे यांचे उदगीरमध्ये झेरॉक्‍सचे दुकान आहे. विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये त्यांची मोठी मुलगी माधवी ही सातवीत तर दुसरी मुलगी मयूरी पाचवीत शिकत आहे. दोघींनाही धावण्याची आवड असल्याने त्यांनी शालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. नागपूर, रत्नागिरी, सातारा येथील आंतरशालेय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. माधवीने तर सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत चमक दाखविली. मुलींमध्ये काहीतरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांनीही प्रोत्साहन दिले. उदगीरला प्रा. सतीश मुंडे यांच्याकडून त्यांना प्रशिक्षण सुरू आहे.

 

पानचौरे म्हणाले, ""हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची इच्छा मुलींना बोलून दाखविली. उदगीर-पुणे अंतर जास्त असल्याने खर्च होणार असला तरी त्यांना होकार दिला. माझ्या मुलींसह आणखी तिघेजण यात सहभागी झाले आहेत. अशा मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे मुलींचा आत्मविश्‍वासही वाढतो. माधवीने 21 मिनिटांत तर तर, मयूरीने 20 मिनिटांत पाच किलोमीटर अंतर पूर्ण केले.''

राष्ट्रीय पातळीवर खेळायचंय
माधवी पानचौरे म्हणाली, "शाळेकडून विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले असून, नुकतीच सातारा येथे राज्यस्तरीय स्पर्धेत धावले होते. कामगिरी सुधारून मला राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची इच्छा आहे. मोठ्या स्पर्धांचा अनुभव येण्यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाची आहे.''